Pune Crime News: रविवार पेठेतील दुकाने फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चिखलीतून अटक

पोलिसांनी परिसरात सापळा रचून विकास याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने एका साथीदारासोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले.

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील रविवार पेठेतील दुकाने फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला फरासखाना पोलिसांनी चिखली परिसरातून अटक केली आहे. या चोरट्यावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल 32 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

विकास ऊर्फ विकी ऊर्फ जंगल्या दिलीप कांबळे (वय 26, रा. कुदळवाडी, चिखली) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑगस्ट रोजी रात्री पुणे शहरातील रविवार पेठेतील काही दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फरासखाना पोलिसांनी तपास करत चोरट्यांची माहिती काढली. आरोपी विकास कांबळे हा चिखली-कुदळवाडी रोडवरील पुलाजवळील पेट्रोल पंपासमोर मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून विकास याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने एका साथीदारासोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले.

पोलिसांनी आरोपी विकासला अटक केली आहे. त्याच्या एका साथीदाराचा आणि वाहनाचा शोध सुरु आहे.

आरोपी विकास हा पोलिसांच्या रेकोर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अपहरण, शरीरावरील गुन्हे, घरफोडी, चोरी असे तब्बल 32 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो चिखली परिसरात भंगार विक्रीचा व्यवसाय करतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.