Pune Crime News : ‘दीदी मला हेल्प हवी’, म्हणाला आणि मोबाईल घेऊन पळाला

एमपीसीन्यूज : मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील स्ट्रीट क्राईममध्ये वाढ झाली आहे. घरफोडीच्या घटना तर रोजच उघडकीस येत आहेत. तर काही दिवसांपूर्वी भुरट्या चोरांनी भररस्त्यात अडवून कोयत्याच्या धारकाने गुगल पे द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले होते. अशा घटना घडत असताना मोबाईल चोरट्यांनी ही उच्छाद मांडला आहे. चंदन नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरट्याने मदत हवी असल्याचा बहाणा करून तरुणीचा मोबाईल चोरून नेला.

एका बावीस वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली असून दोन अज्ञात चोरट्याने विरोधात चंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी मुंढवा खराडी बायपास रस्त्यावर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी खराडी बायपास रोडने मोबाईल फोनवर बोलत पायी जात होते. यावेळी तिच्या जवळ मोपेड दुचाकीवरून दोघेजण आले. ह्यातील एकाने ‘दीदी मला हेल्प हवी’ असे म्हणत तिचे लक्ष विचलीत केले.

या आवाजाने फिर्यादी तरुणीने मागे वळून पाहिले असता दुसऱ्याने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि आणि पळ काढला.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.