Pune Crime News : शिवाजीराव भोसले बँकेवर ईडीचा छापा, कसून चौकशी सुरू

एमपीसी न्यूज – शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या शिवाजीनगर परिसरातील नरवीर तानाजीवाडी येथील मुख्य कार्यालयावर शुक्रवारी सकाळी सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला.

सक्तवसूली संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी मुख्य शाखेच्या कार्यालयात प्रवेश करून चौकशीला सुरुवात केल्याचे समजते. बँकेने केेलेल्या आर्थिक घोटाळ्याशी संबंधीत ही छापेमारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी बँकेचे संचालक आणि विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना गुन्हे शाखेने अटक केली होती. या प्रकरणी भोसले यांच्यासह इतरांवर बँकेत 71 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

बँकेच्या सन 2018-19 या आर्थिक वर्षाचे वैधानिक लेखा परिक्षण करण्यासाठी बँकेने मे. टोरवी पेठे अ‍ॅण्ड कंपनी या चार्टर्ड अकौटंट्स यांची नेमणूक केली होती. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या कंपनीला बँकेची रोख शिल्लक पडताळणी करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यामध्ये सहकार आयुक्तालयास सादर करण्यात आलेल्या बँकेबाबतच्या अहवालात रोख शिल्लक तपासणीमध्ये 73 कोटी 5 लाख 8 हजार 723 इतकी रक्कम कमी असल्याचे नमूद करून आर्थिक अपहार झाल्याचे म्हटले होते. त्यावर तत्कालीन सहकार आयुक्त सतिश सोनी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम 1960 च्या तरतूदीअन्वये मे. टोरवी पेठे अ‍ॅण्ड कंपनी या चार्टर्ड अकौटंट्स कंपनीला अपहारास जबाबदार असणार्‍या संबंधीतांविरूध्द गुन्हा नोंदविण्यासाठी 14 नोव्हेंबर 2019 रोजी पत्रान्वये कळविले होते.

त्यानुसार चार्टर्ड अकौटंट्स योगेश लकडे (वय 29 , रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी या बाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर संबधीत तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवण्यात आली होती. त्यानुसार आ. भोसले, त्यांच्या पत्नी रश्मा भोसले यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.