Pune Crime News : पुणे विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज – पुणे विद्यापीठासह इतरही विविध महाविद्यालयांची बनावट ओळखपत्र तयार करणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून जेजुरी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीरा येथे ही कारवाई करण्यात आली.

गणेश संपत जावळे, मनोज धुमाळ आणि वैभव लोणकर अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कामगिरीमुळे बनावट प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकाचा मोठा घोटाळा समोर आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इतर महाविद्यालयाच्या नावांचे बनावट प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका बनवून त्यांची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली. पुणे विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधून त्यांच्याकडूनही खातरजमा करून घेतली आणि त्यानंतर निरा येथील समीक्षा प्रिंटिंग प्रेस मध्ये धाड टाकली.

यावेळी पोलिसांना त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात बनावट प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका बनवण्याचं काम सुरू असल्याचे दिसून आले. त्यानंतर जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.