Pune Crime News : लष्करात नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने तरुणाची आर्थिक फसवणूक

एमपीसी न्यूज – लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर ओळख असल्याची बतावणी करून नोकरीच्या आमिषाने युवकाला तीस हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी कोल्हापूरातून एकास अटक केली.

अमित अशोक नलावडे (वय 45,रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत राम सुरेश उबाळे (वय 24 रा. चिंचगाव, जि. सोलापूर) याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, उबाळेची एका परिचितामार्फत नलावडे याच्याबरोबर ओळख झाली होती. नलावडेने त्याला लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते तसेच उच्चपदस्थ आधिकाऱ्यांबरोबर ओळख असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर नलावडेने उबाळेकडून वेळोवेळी पैसे घेतले. मात्र, नोकरी मिळवून दिली नाही. उबाळेने नोकरीबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यानंतर लष्करात नियुक्ती झाल्याचे बनावट पत्र नलावडेने उबाळेला दिले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने उबाळेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.

नलावडेला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील भानूप्रिया पेठकर यांनी युक्तीवादात केली. न्यायालयाने नलावडेला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.