Pune Crime News : अर्जंट इंजेक्शनची गरज सांगत रुग्णाच्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक

पुण्याच्या नामांकित रुग्णालयातील प्रकार

एमपीसीन्यूज : नुकत्याच जन्मलेल्या दोन जुळ्या मुलांना अर्जंट इंजेक्शन द्यावे लागेल, असे सांगत एका अज्ञात व्यक्तीने रुग्णाच्या नातेवाईकांची सव्वीस हजार रुपयांनी आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणी एका 38 वर्षीय व्यक्तीने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांची एक नातेवाईक महिला डिलीव्हरीसाठी पुण्यातील नामांकित रुग्णालयात आली होती. शनिवारी त्यांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. यावेळी फिर्यादी हे त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात आले होते.

यादरम्यान फिर्यादी यांना एक फोन आला. समोरच्या व्यक्तीने ‘मी या रुग्णालयात असून, माझे नाव देशपांडे आहे’, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला.

तसेच, आता जन्मलेली जुळी मुले प्रिमॅच्युअर्ड आहेत. यामुळे त्यांच्या फुफ्फुसाचे कार्य नीट चालण्यासाठी त्यांना अर्जंट इंजेक्शन देणे गरजेचे आहे, असे सांगत त्यांना भिती दाखवली.

तसेच हे इंजेक्शन देण्यासाठी त्यांना तात्काळ ‘गुगल पे’च्या माध्यमातून दोन इंजेक्शनचे 26 हजार 700 रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडत त्यांची फसवणूक केली.

हा प्रकार काही वेळातच फिर्यादी यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) उल्हास कदम हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.