Pune Crime News : बराटे टोळीतील आणखी पाच जण अटकेत, मोक्का लागल्यानंतर झाले होते फरार

एमपीसी न्यूज – मोक्का लागल्यानंतर फरार झालेल्या बहुचर्चित बराटे टोळीतील पाच जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या टोळीतील 6 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर रवींद्र बराटेसह दोघे अद्यापही फरार आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

विशाल शिवाजी ढोरे (वय 36), अस्लम मंजूर पठाण (वय 24), सचिन गुलाब धिवार (वय 32), परवेज शब्बीर जमादार (वय 39) आणि बालाजी विश्वनाथ लाखाडे (वय 27) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. तर रवींद्र बराटे व देवेंद्र जैन हे दोघे फरार आहेत.

बराटे व इतरांवर प्रथम कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर एका पाठोपाठ अनेक गुन्हे या टोळीवर दाखल झाले आहेत. त्यात पिस्तूलाचा धाक दाखवून जागा आणि पैसे बळकावले असे, म्हटले आहे. दरम्यान पोलिसांनी हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या गुन्ह्यात या 13 जणांवर संघटित गुन्हेगारी (मोक्का) कायद्यानुसार कारवाई केली आहे. त्यानंतर सातजण फरार झाले होते. त्यांचा शोध युद्ध पातळीवर घेतला जात होता.

मात्र पोलिसांना गुंगारा देण्यात त्यांना यश येत होते. युनिट पाचच्या पथकाला मात्र चौघेजण नंदुरबार येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे व त्यांच्या पथकाने या टोळीला अटक केली. तर एकाला हडपसर येथून पकडण्यात आले आहे. दरम्यान बराटेचा माग काढला जात आहे. त्याला देखील लवकरच पकडण्यात येईल असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.