Pune Crime News : जामिनावर सुटलेल्या आरोपीचे फटाके वाजवून स्वागत करणे भोवले, पाच जणांना अटक

एमपीसीन्यूज : खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या आरोपीचा जामीन झाल्यानंतर फटाके वाजवून त्याचे स्वागत करणाऱ्या पाच जणांना उत्तम नगर पोलिसांनी अटक केली. शिवणे येथील राहुलनगर बस थांबा येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.

सागर राजेंद्र गौड (वय 19), आकाश सिब्बन गौड (वय 19), सागर भालेराव वारकरी (वय 21), अविनाश रामप्रताप गुप्ता (वय 20) आणि सुरेंद्र राजेंद्र गौड (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याशिवाय अभिषेक गुप्ता आणि त्याच्या सहा ते सात साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक संतोष नागरे यांनी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मागील वर्षी उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आकाश गौड, अविनाश गुप्ता, सागर वारकरी आणि सागर गौड यांना अटक करण्यात आली होती.

पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. येरवडा कारागृहात ते बंदिस्त होते. दरम्यान मंगळवारी कोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आले होते.

त्यानंतर मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास वारकरी आणि इतर आरोपींच्या स्वागतासाठी त्यांचे साथीदार राहुल नगर येथील बस थांब्यावर एकत्र जमले होते. हे चौघेही त्या ठिकाणी आल्यानंतर इतरांनी जोरजोराने घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी केली होती. यावेळी त्या ठिकाणी जमा झालेल्या नागरिकांना आरोपींनी शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाच जणांना ताब्यात घेतले तर इतर सहा ते सात जण पळून गेले आहेत. अधिक तपास उत्तम नगर पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.