Pune Crime News : भाजप आमदाराच्या घरात जबरी चोरी, 18 लाखाचे दागिने चोरीला

एमपीसीन्यूज : पर्वती मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या घरात जबरी चोरीचा प्रकार उघडकीस आला. मिसाळ यांच्या वानवडीतील बंगल्यातून तब्बल 18 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत.

वानवडी पोलिसांनी या प्रकरणी महिला कामगारावर संशय व्यक्त केला आहे. ममता दीपक मिसाळ (वय 51) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमदार माधुरी मिसाळ या कुटुंबियासह या बंगल्यात एकत्र राहतात. या बंगल्यामध्ये काम करण्यासाठी 7 कामगार असून यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. या बंगल्यातील बेडरूममध्ये साफ सफाई करण्यासाठी महिला कामगारही येत असतात.

28 नोव्हेंबर रोजी फिर्यादीच्या बेडरूममध्ये ठेवलेला हिरे मोत्यांचा डिझाईन असलेला सोन्याचा हार आणि सोन्याचा हिरे-मोती आणखी एक हार हे कपाटात आढळले नाहीत. तो त्यांनी घरात सर्वत्र शोधला परंतु सापडला नाही. अखेर त्यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये दागिने चोरीला गेल्याची तक्रार दिली.

वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.