Pune Crime News : प्रवासी म्हणून रिक्षात बसवून नंतर लूटमार करणाऱ्या चार सराईतांना अटक

एमपीसी न्यूज – प्रवासी म्हणून रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना निर्जन ठिकाणी घेऊन जात त्यांना मारहाण करत लूटमार करणाऱ्या चार सराईत आरोपींना सहकारनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वसीम अजमल खान (वय 31), मोसिम खान नूर खान पठाण (वय 28), अन्सार अयुब खान (वय 32) आणि अब्दुल करीम बार्शीकर (वय वय 26) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हा गुन्हा करताना त्यांनी रिक्षाचा वापर केला असल्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सेलवम पिल्ले (वय 48) मार्केटयार्ड येथून बालाजी नगर येथे जाण्यासाठी पॅसेंजर म्हणून रिक्षात बसले होते. प्रवासादरम्यान त्यांना रिक्षाचालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी धक्काबुक्की करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली होती. सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अंमलदार संदीप ननवरे व सागर शिंदे यांना वरील आरोपींची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहकारनगर पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी खोडव्यातील शिवनेरी नगर येथून या चार जणांना ताब्यात घेतले. हे सर्व एका रिक्षा मध्ये बसले होते. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी अशाच प्रकारे आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, पोलीस निरीक्षक युनूस मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस हवालदार बापू खुटवड, पोलीस नाईक प्रकाश मरगजे, संदीप ननवरे, सतीश चव्हाण, भुजंग इंगळे, सागर शिंदे, महेश मंडलिक, प्रदीप बेडीस्कर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.