Pune Crime News : बनावट सहीचा मेल पाठवून व्यापाऱ्याची 36 लाखांनी फसवणूक

एमपीसी न्यूज – खासगी बँकेच्या निष्काळजीपणामुळे सायबर चोरट्याने एका व्यापाऱ्याच्या नावाने बनावट सहीचा मेल पाठवून तब्बल 36 लाख 58 हजारांची फसवणूक केली आहे. सायबर चोरट्याने बँकेला ग्राहक असल्याचे भासवून आरटीजीएसद्वारे स्वतःच्या बँकखात्यात वर्ग करण्यास सांगून फसवणूक केली आहे. याप्रकरणी 65 वर्षीय ज्येष्ठाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी ज्येष्ठ नागरिक लोखंडाचे व्यापारी असून सेव्हन लव्ह्ज चौकात राहायला आहेत. त्यांचे एका खासगी बँकेत खाते आहे. 9 मार्चला सायबर चोरट्याने व्यापाऱ्याच्या बनावट सहीचा मेल संबंधित बँकेला पाठविला. माझ्याकडील चेकबुक संपले आहेत. मला तत्काळ रक्कम एकाला द्यायची आहे. कृपया बँकेने आरटीजीएसद्वारे रक्कम वर्ग करावी, असा बनावट मेल पाठविला.

त्यानुसार मार्केटयार्ड येथील बँकेने फिर्यादी व्यापारी यांच्याकडे कोणतीही खातरजमा न करता थेट 36 लाख 58 हजारांची रक्कम सायबर चोरट्याच्या बँक खात्यात पाठवून दिली. बँक खात्यातून रक्कम कमी झाल्याचा मेसेज आल्यानंतर व्यापाऱ्याला फसवणूक झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी बँकेकडील माहिती मागविली असून त्यानुसार तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे यांनी दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.