Pune Crime News : आणखी एका खून प्रकरणातून कुख्यात गुंड गजा मारणे याची निर्दोष सुटका

एमपीसीन्यूज : कुख्यात गुंड गजानन मारणेसह त्याच्या साथीदारांची आणखी एका खून प्रकरणातून विशेष मोक्का न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. गजानन मारणे आणि त्याच्या टोळीने जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील टोळीचे आर्थिक वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तसेच पूर्वीच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी पप्पू गावडे याचा खून केल्याप्रकरणी  गुन्हा दाखल होता. याच गुन्ह्यातून गजानन मारणे आणि टोळीची निर्दोष मुक्तता झाली आहे.

विशेष मोक्का न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी हा निकाल दिला आहे. पुराव्याअभावी आरोपींची मुक्तता केली असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे.

गजानन मारणे, पप्पू उर्फ अतुल लक्ष्मण कुडले, रुपेश कृष्णराव मारणे, संतोष विश्वनाथ शेलार, सुनील नामदेव बनसोडे, गणेश नामदेव हुंडारे, प्रदीप दत्तात्रय कंधारे, अनंता ज्ञानोबा कदम, बाब्या उर्फ श्रीकांत संभाजी पवार, बापु श्रीमंत बागल, गोरक्षनाथ तुकाराम हाळदे, यशवंत उर्फ बाळा दासू बोकेफोडे, उमेश नागू टेमघरे, सतीश उर्फ आबा शिळीमकर अशी निर्दोष सुटका केलेल्यांची नावे आहेत.

लवळे गावाजवळ तीन नोव्हेंबर 2014 सली पप्पू उर्फ संतोष हिरामण गावडे याचा खून झाला होता. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील टोळीचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तसेच पूर्वीच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी हा खून झाला होता.

गजानन मारणे आणि निलेश घायवळ हे दोघेही आर्थिक फायद्यासाठी गुन्हेगारी टोळ्या चालवितात. कोथरूड आणि मुळशी तालुक्यातील जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून या दोन्ही टोळ्यांमध्ये आर्थिक वर्चस्वातून वाद होते. या टोळ्यांनी एकमेकांवर खुनी हल्ले केले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.