Pune Crime News : पोलिसांना धमकावून पळून जाणारे फरार चोर अटकेत, 18 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज – पुण्यातील औंध परिसरात पोलिसांना धमकावून चोर पळून गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेतील फरार चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

या चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल 18 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सनी सिंग पापा सिंग दुधानी (वय 22) आणि सोहेल जावेद शेख (वय 21) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हडपसर पोलिसांनी त्यांना अटक केली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, हडपसर पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी हनुमंत गायकवाड हे 13 एप्रिलच्या रात्री आपल्या काही सहकाऱ्यांसह गस्तीवर होते. यावेळी त्यांना आरोपी दुधानी आणि शेख हे दोघे जण बिराजदार नगर येथील कालव्याजवळ फिरत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यांना पकडण्यासाठी पोलीस गेले असता त्यांना पाहून हे दोघेजण दुचाकीवरून पळून जाताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशी त्यांनी भोसरी, चाकण, हडपसर, कोरेगाव पार्क आदी परिसरात 12 घरफोड्या केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील तब्बल 18 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केला आहे.

यातील दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. हनी सिंग दुधानी याच्यावर 68 गुन्ह्यांची नोंद आहे तर सोहेल शेख याच्यावर सोळा गुन्हे दाखल आहेत. आरोपी वाहन चोरी करून त्याचा वापर घरफोडीसाठी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.