Pune Crime News : वाढदिवसाची पार्टी देण्याच्या निमित्ताने अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – वाढदिवसाची पार्टी देण्याचे आमिष दाखवून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी गँगरेप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

दत्तवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. पीडित मुलीने विरोध केला असता तिच्यावर एका आरोपीने गोळी झाडली. या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, जनता वसाहत परिसरात पीडित मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहते. 15 दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या एका मैत्रिणीने आपल्याला एका मित्राच्या वाढदिवसाला जायचे आहे असे सांगून तिला वारजे परिसरात नेले. त्याठिकाणी वाढदिवस साजरा झाल्यानंतर एका खोलीत नेऊन पीडित मुलीवर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला.

या प्रकारानंतर घाबरलेली मुलगी घरी जाण्यासाठी निघाली असता आरोपींनी तिला आणखी दोघे येणार आहेत त्यामुळे घरी जाऊ नकोस असे सांगत तिला अडवून ठेवले. तरीही पीडित मुलगी घरी जाण्यासाठी निघाली असता एका आरोपीने तिच्या दिशेने गोळी झाडली. पीडित मुलीने यावेळी छातीजवळ मोबाईल ठरलेला असल्यामुळे ही बंदुकीची गोळी या मोबाईलवर लागली. त्यामुळे सुदैवाने तिला गंभीर दुखापत झाली नाही. आरोपींनी त्यानंतर तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या मुलीला तिला घरी घेऊन जाण्यास सांगितले.

अशी उघडकीस आली घटना
गुन्हे शाखेचे पथक शहर परिसरात गस्त घालत असताना त्यांना काही व्यक्तीजवळ पिस्तुल असून त्यांनी गोळीबार केली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. पिस्तुल कुठून आणले याबाबत चौकशी करीत असताना हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलीचा शोध घेत गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.