Pune Crime News : संभाजी उद्यानाजवळील टपरीतून सव्वा लाखाचा गुटखा जप्त

एमपीसीन्यूज : गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकाजवळ संभाजी उद्यान येथे एका टपरीधारकावर कारवाई करुन एक लाख ३० हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. गुन्हा दाखल करून या आरोपीला डेक्कन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

अवैध धंदे आणि गुटखा विक्री संदर्भात गुन्हे शाखा युनिट एकचे पथक पुणे शहरात गस्त घालत होते. त्यावेळी पथकातील पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना यांना संभाजी उद्यानाजवळील पानाच्या टपरीत एक इसम गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री करीत असल्याची खबर मिळाली.

त्याआधारे पथके तेथे छापा मारुन संबंधित इसमाला ताब्यात घेतले. या टपरीमध्ये खाकी बाॅक्स व पोत्यामध्ये विमल पान मसाला तंबाखूसह, आरएमडी माणिकचंद, रजनीगंधा तंबाखू, तुलसी तंबाखू, असा एकूण 1 लाख 30 हजार 998 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संबंधित आरोपीविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला पुढील कारवाईसाठी डेक्कन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सुनील कुलकर्णी, हनुमंत शिंदे, पोलीस अंमलदार सतिश भालेकर, सचिन जाधव, अशोक माने, महेश बामगुडे,अय्याज दड्डीकर, इम्रान शेख , शशिकांत दरेकर, तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.