Pune Crime News : दर्शन घेण्याच्या बहाण्याने आला अन् चोरी करून गेला, पुण्यातील डुल्या मारुती मंदिरात चोरी

एमपीसी न्यूज – पुण्यातील गणेश पेठ येथील प्रसिद्ध डुल्या मारुती मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका चोरट्याने मंदिरात येऊन दर्शन घेण्याचा बहाणा करून दानपेटीत रोख रक्कम चोरून नेली. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये चोरीचा हा प्रकार कैद झाला आहे. 2 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असली तरी त्या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नाही.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गणेश पेठ परिसरात डुल्या मारुतीचे मंदिर आहे. 2 फेब्रुवारी रोजी एक अज्ञात व्यक्ती दर्शन घेण्यासाठी म्हणून मंदिरात आला. त्याने तोंडावर मास्क लावला असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये दिसत आहे. दरम्यान दर्शन घेत असल्याचे सोंग करून त्याने इकडे तिकडे पाहत आपल्याकडे कुणी पाहत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मंदिरातील दान पेटी चे कुलूप तोडून त्यातील रोख रक्कम खिशात घातली. चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे.

या चोरट्यांनी छोट्या स्क्रू ड्रायव्हर च्या मदतीने सर्वप्रथम दानपेटी चे कुलूप तोडले. त्यानंतर त्यातील रोख रक्कम चोरून नेली. दरम्यान काही वेळाने मंदिरात आलेल्या एका छोट्या मुलाला दानपेटी चे कुलूप तुटले असल्याचे लक्षात आले. त्याने हा प्रकार मंदिरातील सेवकांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर मंदिराच्या विश्वस्तांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. या चोरट्याने नेमके किती रुपये दान पेटीतून चोरले हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.