Pune Crime News : सराईत घरफोड्या जेरबंद, 6 लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसीन्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने एका सराईत घरफोड्याला अटक केली. त्याने केलेले घरफोडीचे नऊ गुन्हे उघडकीस आले असून तब्बल साडे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

अमरसिंग जगरसिंग टाक (रा. गोसावीवस्ती, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दोन दिवसापूर्वी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीला ढकलून देऊन त्याची कार चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास सुरू असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांना हा गुन्हा अमरसिंग टाक यांनी केला असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी अमरसिंग याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने आणखी एका साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच त्याने आतापर्यंत घरफोडीचे आणि चोरीचे नऊ गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सहा लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, कर्मचारी नितीन मुंढे, मछिंद्र वाळके, राहुल माने, ऋषीकेश टिळेकर, प्रतीक लाहीगुडे, शेखर काटे, नितीन घाडगे व संजय देशमुख यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.