Pune Crime News : 25 लाखाच्या बदल्यात 50 लाख देण्याच्या आमिषाने हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक

तिघांना अटक

एमपीसीन्यूज : 25 लाखाच्या बदल्यात 50 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत 23 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. आरोपींनी 25 लाख घेऊन हातात कागदात गुंडाळून डुप्लिकेट बंडल देऊन फसवणूक केली आहे.

प्रवीण प्रकाश (वय 30, काळेवाडी), मालेश सुरेश गावडे (वय 42) व व्यंकटरमण वसंतराव बाहेकर (वय 40, कर्वेनगर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी शिवणे परिसरात 36 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे हॉटेल व्यावसायिक आहेत. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने त्यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधत आमच्याकडे मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनी असून हे पैसे बाळगण्यासाठी त्यांना दोन हजार रुपयाच्या नोटा पाहिजे असल्याचे सांगितले. त्यासाठी 50 लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवले.

दरम्यान त्यांच्या या आमिषाला फिर्यादी बळी पडले. त्यानुसार 25 लाखाच्या बदल्यात पन्नास लाख रुपये मिळतील या आमिषाने फिर्यादीने व्यवहार पुढे सरकवला. त्यानुसार 23 फेब्रुवारी रोजी आरोपींनी त्यांच्याकडून 25 लाख रुपये घेतले आणि त्या बदल्यात 50 लाख रुपये म्हणून कागदात गुंडाळून डुप्लिकेट नोटांच्या बंडलाचे आकाराचे कागदे देऊन फसवणूक केली आहे.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने फरासखाना पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करतात तिघांना अटकही केली. या संपूर्ण प्रकरणातील सूत्रधार अद्यापही पसार आहे. यातील पैसेही त्याच्याकडेच असल्याचे सांगण्यात येत आहे.

फरासखाना पोलिस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.