Pune Crime News : विवाह नोंदणी संकेतस्थळावरून ओळख, नंतर लग्नाचे आमिष दाखवून सोळा लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – विवाह नोंदणी संकेतस्थळावरून ओळख झाल्यानंतर एका 32 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर सोळा लाख रुपये घेत तिची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्ती विरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेने एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर आपले नाव नोंदवले होते. हे नाव पाहून आरोपीने त्यांच्याशी संपर्क साधला आणि ओळख वाढवली. त्यांना विवाह करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्याशी बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना लग्न करण्याचे अमिष दाखविले. त्याने आपण व्यावसायिक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याने एका प्रकल्पासाठी पैसे हवे असल्याचा बहाणाकरत त्यांच्याकडून वेळोवेळी 16 लाख 26 हजार रुपये घेतले.

इतके सारे पैसे घेतल्यानंतर आरोपीने या महिला सोबत लग्न करण्यास नकार दिला. ही महिला लग्नासाठी तगादा लावत राहिली आणि तो वेगवेगळी कारणे सांगून लग्न करण्याचे टाळत राहिला. या सर्व प्रकारानंतर अखेरीस आपली फसवणूक होत असल्याचे या महिलेच्या लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.