Pune Crime News ; शिवाजीनगर, हडपसरमध्ये पोलिसांना धक्काबुक्की, गणवेशही फाडला, 9 जण अटकेत

एमपीसीन्यूज : समजावून सांगण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचा-यांसह अधिका-यांना धक्काबुक्की करीत गणवेश फाडल्याच्या दोन घटना शिवाजीनगर आणि हडपसरमध्ये घडल्या आहेत. याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

हॉटेल बंद झाल्यानंतरही रस्त्यावर थांबून आरडा-ओरडा करणा-या तरूणांना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या कर्मचा-यासह पोलीस उपनिरीक्षकाला तिघांनी धक्काबुक्की केली. त्याशिवाय अधिका-याला ढकलून देत त्यांचा गणवेश फाडला. ही घटना काल पहाटे साडेतीनच्या सुमारास शिवाजीनगरमधील हॉटेल अ‍ॅम्बेसिडरसमोर घडली.

योगिराज सोमनाथ बनकर (वय २३, रा. मांजरी, हडपसर), विनोद संजय कुदळे (वय २० रा. सातववाडी, हडपसर) आणि रोहत राजू शिंदे (वय २४, रा. गंगानगर हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई दीनेश वीर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुस-या घटनेत भांडणे सोडविल्याचा राग मनामध्ये धरून पोलिस शिपायाला मारहाण करीत गणवेश फाडल्याची घटना हडपसरमधील मांजरी गेटजवळ घडली आहे.

याप्रकरणी रशीद शेख (वय ४७), सलीम शेख (वय ५१), विक्रम रेड्डी (वय ३०), तरून्नुम शेख (वय ३६) , सायरा शेख (वय ४४) , अरबाज शेख (वय २१) यांना हडपसर पोलिसांनी अटक केले आहे. महेश मदने यांनी फिर्याद दिली आहे.

दोन दिवसांपुर्वी गोपाळपट्टी मांजरी परिसरात दोन गटात पैशांवरून वाद सुरू होते. त्यावेळी पोलीस शिपाई महेश मदने यांनी भांडणे सोडविली. त्याचा राग आल्यामुळे ८ जणांच्या टोळक्याने महेश यांना मारहाण करून त्यांचा गणवेश फाडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.