Pune Crime News : संतापजनक ! अपहरण, बलात्कारानंतर चिमुरडीची निर्घृण हत्या; नराधमाला बेड्या

0

एमपीसीन्यूज : दोन वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिचा खून केल्याचा संतापजनक प्रकार  पुणे ग्रामीण पोलीस दलातील वेल्हे पोलीस स्टेशनच्या हद्दीतून प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एका नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

संजय बबन काटकर (वय 38, रा. कादवे, ता.वेल्हे, जि पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी रोजी दोन वर्षीय चिमुरडीचे घराजवळून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी वेल्हे पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली होती.

_MPC_DIR_MPU_II

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली. ग्रामीण पोलीस दलातील 50 हून अधिक कर्मचारी या शोधकार्यात सहभागी झाले होते. त्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी हवेली तालुक्यातील एका पुलाखाली अपहृत मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता.

शवविच्छेदनानंतर या चिमुरडीवर बलात्कार झाल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरू केला होता.

दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या चिमुरडीच्या घराजवळच राहणारा संजय काटकर हा बेपत्ता असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्याला संशयित आरोपी ठरवून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. तपासादरम्यान संजय काटकर हा रायगड जिल्ह्यातील नाटे गावातील एका वीटभट्टीवर लपून बसल्याचे पोलिसांना समजले होते.

त्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या एका तपास पथकाने रायगड जिल्ह्यात जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment