Pune Crime News : गुंड सचिन पोटे आणि अजय शिंदे टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांकडून मागील काही दिवसांपासून सातत्याने कारवाई सुरू आहे. पुणे पोलिसांनी अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आज गुंड सचिन पोटे आणि अजय शिंदे यांच्या टोळीवर मोक्कानुसार कारवाई केली आहे.

या टोळीतील सचिन निवृत्ती पोटे (वय 40), अजय अनिल शिंदे (वय 36), विठ्ठल महादेव शेलार (वय 38), अजिंक्य उर्फ अजय उर्फ अज्जू राजाराम पायगुडे (वय 28), दगडू भीमराव वैद्य (वय 36), अनुप अशोक कांबळे (वय 36), अतिक इस्माईल शेख (वय 33), मुन्ना उर्फ हेमं मारुती कानगुडे (वय 35), बाबू उर्फ अंकुश धारू निवेकर (वय 26) आणि अमोल सतीश चव्हाण (वय 31) 10 सदस्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

2018 मध्ये सचिन पोटे आणि त्याच्या साथीदारांनी मुंढवा येथील एका हॉटेलमध्ये गोळीबार केला होता. या हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी एक दांपत्य आले होते. या दांपत्यास सोबत वाद घालत सचिन पोटे याने गोळीबार केला होता. त्या वेळी घटनास्थळी भेट दिलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र गोळीबार झाला नसल्याचा अहवाल दिला होता.

मात्र, या प्रकरणात फिर्यादीने आता नव्याने फिर्याद दिल्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी चौकशी करत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार नव्याने केलेल्या चौकशीत सचिन पोटे आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण टोळीवर मोका अंतर्गत कारवाई केली.

सचिन पोटे हा सराईत गुन्हेगार आहे. काही साथीदारांना सोबत घेऊन त्याने गुन्हेगारी टोळी तयार केली होती. त्यानंतर आर्थिक फायद्यासाठी तो गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया करताना आढळून आला. त्याच्या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणी , जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत.

या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा युनिट चारचे पथक करत आहे. त्यांनी या टोळीवर मोक्कानुसार कारवाई करावी असा प्रस्ताव उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी या प्रस्तवाची छाननी केली. तसेच तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला. त्यानुसार पोलीस आयुक्त यांनी मोक्कानुसार कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.