Pune Crime News : कोंढव्यातील मुनाफ पठाण टोळीवर मोक्का

एमपीसीन्यूज : पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी गुन्हेगारांच्या टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई सुरु केली आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील 15 हून अधिक गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. यामध्ये आणखी एका टोळीची भर पडली असून कोंढव्यातील मुनाफ पठाण टोळीवर मोक्काची कारवाई केली आहे.

बंडू आंदेकरवर मोक्का लावल्यानंतर कृष्णराज आंदेकर याचा या मोक्कात समावेश करण्यात आला आहे.

मुनाफ रियाज पठाण (वय 23, नाना पेठ), कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय 31), विराज जगदीश यादव (वय 25), आवेज आशपाक सय्यद (वय 20), अनिकेत ज्ञानेश्वर काळे (वय 25), अक्षय नागनाथ कांबळे (वय 23), शहावेज उर्फ शेरु अब्दुल रशीद शेख (वय 34), अमन युसूफ खान (वय 20) व यश सुनील ससाणे (वय 20) अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मुनाफ पठाण याच्या टोळीतील काही व्यक्तींनी कोंढवा परिसरात एका तरुणावर गोळीबार केला होता. याची माहिती देण्यासाठी तो तरुण पोलीस ठाण्यात जात असताना आरोपींनी त्याचा परत पाठलाग करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान मुनाफ पठाण याने गुन्हेगारांची टोळी करून एकत्र गुन्हे करण्यास सुरुवात केली होती. त्याच्या टोळीवर वेगवेगळे नऊ गुन्हे दाखल आहेत.

या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव कोंढवा पोलीस ठाण्याचे अधिकारी सरदार पाटील यांनी सादर केला होता. त्यानंतर परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी या प्रस्तावाची छाननी केली व तो अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे सादर केला.

त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार चव्हाण यांनी मोक्काची कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.