Pune Crime News : पुण्यात पूर्ववैमनस्यातून मित्राचा खून; आरोपी काही तासांत जेरबंद

एमपीसी न्यूज : भवानी पेठ परिसरात पूर्ववैमनस्यातून मित्रानेच मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोंढवा पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला जेरबंद केले आहे.

सिद्धार्थ उर्फ धुमाळ मनोज शिरवाल (वय 38), असे अटक आरोपीचे नाव आहे. तर अजय दादू खुडे (वय 30) याचा खून करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि मृत व्यक्ती हे मित्र होते. चार वर्षांपूर्वी अजय खुडे यांची पत्नी बेपत्ता झाली होती. पत्नी बेपत्ता होण्यामागे सिद्धार्थ यांचा हात असल्याचा संशय अजय याच्या मनात होता. त्यामुळे त्याने सिद्धार्थवर या पूर्वी एकदा प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. मात्र, त्यानंतरही अजय हा सिद्धार्थला धमकावत होता.

त्यामुळे अजय आपला खून करील, अशी भीती सिद्धार्थला होती. याच भीतीपोटी सिद्धार्थने बुधवारी रात्री अजयला गोड बोलून कोंढव्यातील एका मैदानाजवळ बोलावले. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चाकूचे वार करून त्याचा खून केला.

दुसऱ्या दिवशी पहाटे मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच युद्धपातळीवर तपास करुन काही तासातच आरोपीला अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.