Pune Crime News : हडपसरमध्ये भर रस्त्यात महिलेचा खून 

एमपीसीन्यूज  :  पुण्याच्या हडपसर परिसरातील भेकराईनगरमध्ये चाकूने सपासप वार करत भर रस्त्यामध्ये महिलेचा  निर्घृणपणे खून करण्यात आला.  बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

शुभांगी सागर लोखंडे (वय 21) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती सागर बाळू लोखंडे (वय 23) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सागर आणि शुभांगी यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. उरुळी देवाची परिसरात दोघेही राहत होते. सागर हा व्यसनांच्या आहारी गेला होता. तो सतत दारू आणि गांजा पीत असे.

_MPC_DIR_MPU_II

त्याच्या या स्वभावाला कंटाळून शुभांगी वारंवार माहेरी जात होती. आजही शुभांगी भांडणाला कंटाळून माहेरी आली होती. त्यानंतर ती आज सकाळच्या सुमारास कामावर जात असताना सागरने तिला रस्त्यात गाठले आणि घरी येण्यास सांगितले. त्यावर शुभांगीने नकार दिला.

यावरून भररस्त्यात दोघांचे भांडण सुरू झाले. त्यानंतर सागरने रागाच्या भरात शुभांगीच्या पोटावर चाकूने सपासप वार केले.  यामध्ये गंभीर जखमी झाल्याने शुभांगी रक्ताच्या थारोळ्यात भर रस्त्यात पडली होती.

याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शुभांगीला रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.