Pune Crime News : दांडेकर पुलावर कोयत्याने वार करत तरुणाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज – पुण्यातील दांडेकर पुलावर गुन्हेगारांनी कोयत्याने सपासप वार करत एका तरुणाचा निर्घृण खून केला. रविवारी रात्री हा प्रकार घडला. यामध्ये अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. रोहन राजू कदम (वय १९) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रेम माने (वय १९) या तरुणाने तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार तरुण मृत रोहन आणि आणखी एका मित्रासोबत दांडेकर पूल परिसरात पेट्रोल पंपासमोर बसला होता. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी हातात कोयते घेऊन त्या ठिकाणी आले आणि त्यांनी शिवीगाळ करत तिघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच रोहन याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले होते. यातील रोहन कदम याचा उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी मृत्यू झाला.

दत्तवाडी पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी खून केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. परंतु, यामध्ये एकाचा खून झाल्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास दत्तवाडी पोलिस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.