Pune Crime News : ‘त्या’ पीएमपीएमएल चालकाचा खून पूर्ववैमनस्यातून, चौघांना अटक

एमपीसी न्यूज – लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी गौतम उर्फ अमोल मच्छिंद्र साळुंखे (वय 29) या पीएमपीएमएल चालकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. या गुन्ह्याचा छडा लागला असून पोलिसांनी खून करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कामगिरी केली.

ऋषिकेश संजय बोरगावे (वय 31), अक्षय हनुमंत जाधव (वय 21), प्रज्वल सचिन जाधव (वय 20) आणि तुषार सूर्यकांत जगताप (वय 21) या चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर अन्य एक आरोपी फरार आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मृत गौतम उर्फ अमोल मच्छिंद्र साळुंखे हे पीएमपीएल चालक होते. शनिवारी रात्री ड्युटी संपल्यानंतर ते बेपत्ता झाले होते. दरम्यान रविवारी सकाळी लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीत त्यांचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. गुन्हे शाखा 6 चे पोलीस देखील या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते.

तपासादरम्यान पोलीस नाईक नितीन मुंडे आणि नितीन शिंदे यांनी हडपसर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी त्यांना हा गुन्हा ऋषिकेश बोरगावे आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली होती. खून केल्यानंतर ते उमरगा जिल्हा उस्मानाबाद येथे पळून गेले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उमरगा येथे जाऊन एका लॉजमधून वरील आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशी त्यांनी खून केल्याची कबुली दिली.

मयत गौतम उर्फ अमोल मच्छिंद्र साळुंखे आणि आरोपी दोन ते तीन ठिकाणी एकत्र दारू पिले होते. यातील आरोपी ऋषिकेश बोरगावे आणि गौतम याचे यापूर्वी वाद झाले होते. दारूच्या नशेत त्याने याच कारणावरून पुन्हा एकदा भांडण झाले. आणि सर्व आरोपींनी संगनमत करून डोक्यात दगड घालून गौतम त्याचा खून केला आणि पसार झाले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोणताही पुरावा मागे नसताना 24 तासाच्या आत आरोपींना अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी मच्छिंद्र वाळके, नितीन मुंडे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे यांच्या पथकाने केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.