Pune Crime News: विमाननगर परिसरात ‘प्रेस’च्या वाहनातून साडेनऊ लाखाचा गांजा जप्त; दोघांना अटक

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील विमाननगर भागात असलेल्या कमिंस इंडिया कंपनीच्या गेटजवळ गुन्हे पोलिसांनी छापा टाकून साडे नऊ लाखाचा 37 किलो गांजा जप्त केला आहे. या गांजाची साठवणूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

रवींद्र योसेफ आढाव (वय 21) आणि गोरक्षनाथ लक्ष्मण दहातोंडे (वय 41) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस नाईक सचिन जाधव यांना  विमाननगर परिसरातून गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कमिंस इंडिया कंपनीच्या गेटजवळ थांबलेल्या एका चार चाकी गाडीची तपासणी केली.

या मध्ये त्यांना दोन गोण्यांमध्ये 37 किलो 200 ग्रॅम गांजा आढळला. या गांजाची किंमत साडेनऊ लाख रुपये इतकी आहे.

आरोपींनी गांजाची वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी पकडू नये यासाठी गाडीच्या समोरील बाजूला ‘प्रेस’चे स्टिकर लावले होते. तसेच ‘निळा प्रहार स्पेशल फोरम तालुका अध्यक्ष’ या नावाचे स्टिकर ही गाडीवर लावण्यात आले होते.

पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींविरोधात अहमदनगर तालुक्यातील सोनई पोलीस स्टेशनमध्ये दारूविक्रीचा गुन्हा दाखल आहे.

गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, संजय गायकवाड, हनुमंत शिंदे, अंमलदार सचिन जाधव, इम्रान शेख , प्रशांत गायकवाड, महेश बामगुडे, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.