_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune Crime News : सैन्यदल भरती पेपर फोडणाऱ्या मुख्यसूत्रधार अधिकाऱ्याला साथीदारांसह अटक

एमपीसी न्यूज – सैन्यदल भरतीचा पेपर फोडणाऱ्या मुख्यसूत्रधार अधिकाऱ्याला सिकंदराबाद व त्याच्या साथीदारांना दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अधिकारी वसंत किलारी, प्रक्रिया प्रमुख अधिकारी भगतप्रितसिंग बेदी, नारनेपाटी विरप्रसाद, आर्मी अधिकारी थिरु मुरगन, अशी अटक आरोपींची नावे आहेत.

तसेच यापूर्वी किशोर गिरी (रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे), माधव गित्ते (रा. सॅपर्स विहार कॉलनी, विश्रांतवाडी, पुणे), गोपाळ कोळी (रा. बीईजी सेंटर, दिघी, पुणे) व उदय औटी (रा. बीईजी सेंटर, खडकी, पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या स्थलसेनेमध्ये वेगवेगळया पदासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबविली जात असते. अशाच प्रकारे ट्रेनिंग बटालियन 2, पुणे येथे व भारतभर 40 केंद्रात आर्मी शिपाई या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. त्याची लेखी परीक्षा 28 फेब्रुवारी 2021 रोजी होणार होती. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडून काही इसम ती प्रश्नपत्रिका व्हॉटसॲपवरुन वेगवेगळया खाजगी सैनिक भरती प्रशिक्षण केंद्रप्रमुखांना भरघोस रकमेला विकत होते.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत माहिती मिळाली असता पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोपी किशोर गिरी, माधव गित्ते, गोपाळ कोळी व उदय औटी यांचा सैन्य भरती पेपर फोडण्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली होती.

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत आरोपींकडून हस्तगत केलेली प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे भारतीय सेनेच्या संबंधित अधिका-यांनी प्रमाणित केले. त्यानंतर संपूर्ण भारतातील सैन्य भरती परीक्षा रद्द करण्यात आली होती.

या परीक्षेचा पेपर आरोपींना कसा व कुठून प्राप्त झाला याचा तपास चालू असताना सदरचा पेपर हा तामिळनाडू येथील आर्मी अधिकारी थिरु मुरगन याच्या मोबाईल व्हॉटसॲपवरुन आल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, परीक्षेचा पेपर दिल्ली येथील सैन्य अधिकारी वसंत किलारी यांच्याकडून आल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

गुन्हयाचा तपास सुरु असताना ओ.ओ.सी. सेंटर सिकंदराबाद येथील भरती प्रक्रिया प्रमुख अधिकारी भगतप्रितसिंग बेदी यांनी सदर पेपर लिक केल्याची माहिती मिळाली. आर्मी अधिकारी भगतप्रितसिंग बेदी याला सिंकदराबाद येथे जाऊन कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन अटक करण्यात आली आहे.

दुसरा सहकारी नारनेपाटी विरप्रसाद याला नवी दिल्ली येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. आतापर्यंत या गुन्हयांत 9 आरोपीतांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.