Pune Crime News : पुण्याच्या दत्तनगर परिसरातील ‘त्या’ गोळीबार प्रकरणी एकाला अटक, मुख्य सूत्रधार अद्यापही पसार

एमपीसी न्यूज – भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 फेब्रुवारी रोजी गोळीबाराची घटना उघडकीस आली होती. एका किराणा दुकानदारावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

अशोक गोविंदराव गवई (वय 55, रा. वारजे माळवाडी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर त्याचे तीन साथीदार अजूनही फरार आहेत. या घटनेत विशाल प्रल्हाद पंजाबी (वय 36) हे जखमी झाले होते. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तनगर परिसरात पंजाबी यांचे किराणा सामानाचे मोठे दुकान आहे. 14 फेब्रुवारी च्या रात्री काही हल्लेखोरांनी पंजाबी यांच्यावर दुकानाबाहेर गोळीबार केला होता. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. यामध्ये जखमी झालेल्या पंजाबी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान मागील एक महिन्यांपासून पोलीस या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी झटत होते. परंतु त्यांना यश येत नव्हते. दरम्यान पुणे पोलिसांची गुन्हे शाखा आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत आरोपी अशोक गवई यांची माहिती काढली. मात्र तो पसार झाला होता.

दरम्यान गवई आंबेगाव बुद्रुक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने लूटमार करण्यासाठी हा गोळीबार केल्याची कबुली दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.