Pune Crime News : फुकटात ‘चिकन लॉलीपॉप’ घेऊन निघालेल्या सराईत गुन्हेगाराला विरोध केला म्हणून कोयत्याने ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – पैसे न देता चिकन लॉलीपॉप घेऊन निघालेल्या सराईत गुन्हेगाराला विरोध केला असता त्याने कोयत्याने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डायस प्लॉट येथील नुरानी मस्जिद जवळ हा प्रकार घडला.

याप्रकरणी सराईत गुन्हेगार गोविंदसिंग पापुलसिंग टाक (वय 28) याच्यासह सहा जणांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गोविंदसिंग टाक याला पोलिसांनी अटक केली आहे. उझेर हसीन खान (वय 19) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, डायस प्लॉट येथे फिर्यादी यांचे रब्बानी केटरर्स नावाचे दुकान आहे. आरोपी गोविंद सिंग टाक हा बुधवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या दुकानावर आला. आणि पैसे न देतात चिकन लॉलीपॉप घेऊन जात होता. यावेळी फिर्यादीचे चुलते सोनू शेख यांनी त्याला विरोध केला. याच कारणावरून आरोपी पाच साथीदारांचा हातात कोयते, पालघन यासारखे हत्यार घेऊन त्या ठिकाणी आला आणि त्याने परिसरात दहशत माजवली.

दरम्यान आरोपींना पाहून फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक पळून जात असताना आरोपी गोविंद सिंग टाक याने फिर्यादीना थांबवून त्यांच्या डोक्यात कोयता मारण्याचा प्रयत्न केला. तर इतर आरोपींनी फिर्यादीच्या नातेवाईक असलेल्या तरुणाचा पाठलाग करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या सर्व प्रकाराने डायस प्लॉट परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्वारगेट पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना अटकही केली आहे अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.