Pune Crime News : नोकरीच्या आमिषाने उच्चशिक्षित तरुणीचे पळवलेले साडेनऊ लाख रुपये पोलिसांनी परत मिळवून दिले
एमपीसी न्यूज – उच्चशिक्षित तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून पळवलेले साडेनऊ लाख रुपये पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने या तरुणीला पुन्हा परत मिळवून दिले आहेत. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर सायबर पोलिसांनी पाठपुरावा करत संबंधित बँक खाते गोठवले आणि हे पैसे परत मिळवले. तीन महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला होता.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणी ही उच्चशिक्षित आहे. चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराचा जॉब मिळावा यासाठी त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अनेक ठिकाणी आपला बायोडाटा पाठवला होता. हाच बायोडाटा सायबर चोरट्यांच्या हाती लागला आणि त्यांनी या तरुणीला फोन करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि वेगवेगळी कारणे सांगत या तरुणी कडून वेगवेगळ्या बँक खात्यात तब्बल 9 लाख 13 हजार रुपये भरण्यास भाग पाडले.
दरम्यान इतकी पैसे भरूनही नोकरी न देता समोरील व्यक्ती आणि की पैशाची मागणी करू लागला तेव्हा या तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनीही तत्काळ गुन्हा दाखल करीत तपासाला सुरुवात केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार हे या गुन्ह्याचा तपास करत होते. सर्वात प्रथम त्यांनी त्यांच्या बँक खात्यात पैसे भरले हे बँक खाते पाठपुरावा करून गोठवले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पार पाडत रिटर्न ऑफ प्रॉपर्टीचे आदेश पारित करुन तक्रारदार यांचे गेलेले 9 लाख 13 हजार रुपये परत मिळवून दिले आहेत.
हि कामगिरी पोलीस निरीक्षक मच्छिद्र पंडित, अंकुश चिंतामण, सहाय्यक निरीक्षक गणेश पवार व त्यांच्या पथकाने केली आहे.