Pune Crime News : बेकायदा बांधकाम प्रकरणी पुण्यातील पोलीस निरीक्षकावर कारवाईची टांगती तलवार

एमपीसी न्यूज – अहमदनगर जिल्ह्यात कर्तव्यावर असताना पोलीस चौकीचे बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी वादात सापडलेल्या सध्या पुण्यात ड्यूटीवर असलेल्या पोलीस निरिक्षकावर कारवाईची टांगती तलवार आहे.

औरंगाबाद खंडपीठाने जिल्हा पोलिस प्रमुखांना या पोलीस निरिक्षकावर केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. खंडपीठाच्या या आदेशाने पुण्यासह नगर जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

श्रीरामपूर पोलिसांनी हरेगाव फाटा येथे पोलीस चौकी उभारली होती. या पोलीस चौकीविरोधात पारनेर येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे व श्रीरामपूर येथील संदीप कुलकर्णी यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी 14 जानेवारी रोजी खंडपीठात सुनावणी झाली होती. यानंतर 16 जानेवारी रोजी जिल्हा पोलीस प्रमुखांनी खंडपीठात अहवाल सादर केला. मात्र त्यावर खंडपीठाचे समाधान झाले नाही.

तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले निरीक्षक मसूद खान व सध्या संगमनेर येथे कार्यरत असलेले पोलीस उपअधीक्षक राहुल मदने या अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलावार कायम आहे.

दरम्यान पोलीस प्रशासनाने चौकीच्या उभारणीत कोणत्याही प्रकारे लोकवर्गणी जमा केली नाही, तर काही स्थानिक दानशूर मंडळींनीच ती उभारून पोलिसांच्या ताब्यात दिली, असे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी खंडपीठात 16 डिसेंबर रोजी म्हणणे मांडले होते. मात्र ते खंडपीठाने फेटाळून लावले आहे. 8 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.