Pune Crime News : फेसबुकवरून खरेदी केले श्वानाचे पिल्लू, पण अखेरपर्यंत…
एमपीसी न्यूज – पुण्यातील एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी फेसबुकवरून रिट्रीव्हर जातीच्या श्वानाचे पिल्लू खरेदी केले होते. यासाठी त्या व्यक्तीने तब्बल 9 हजार रुपये मोजले होते. परंतु श्वानाच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याचे सांगत अखेरपर्यंत हे पिल्लू त्यांच्यापर्यंत पोहोचलेच नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.
विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी 34 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार फेसबुक वापरणारा अनिकेत देशमुख नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना श्वान घ्यायचा होता. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर शोधशोध केली असता फेसबुकवर त्यांना श्वान विक्रीची जाहिरात दिसली. त्यानुसार त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर समोरील व्यक्तीने त्यांना रिट्रीव्हर जातीचे श्वानांचे पिल्लू पाहिजे असल्याचे सांगितले. परंतु पैसे दिल्यानंतरही फिर्यादी यांना हे श्वान मिळाले नाही.
फिर्यादीने संबंधित व्यक्तीला संपर्क साधला असता त्याने श्वानाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. फिर्यादीने त्याला पैसे परत मागितले असता त्याने देण्यास नकार दिला. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.