Pune Crime News : ॲड. उमेश मोरे खून प्रकरणात अटकेत असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या सचिवाचा राजीनामा

एमपीसीन्यूज : ॲड.उमेश मोरे खून प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी अटक केल्यानंतर पुणे बार असोसिएशनचा सचिव ॲड. घनशाम दराडे याने आपल्या पदाचा राजीनामा दिला. पुणे बार असोसिएशनच्या सभासदांनीही सर्वानुमते राजीनाम्याचा ठराव मंजूर केला.

1 ऑक्‍टोबर रोजी ॲड. उमेश मोरे यांचे शिवाजीनगर न्यायालय परिसरातून गोड बोलून चारचाकीतून अपहरण केले. त्यानंतर गाडीतच त्यांचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह ताम्हीणी घाटात नेऊन पेट्रोल ओतून जाळला.

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत कपिल विलास फलके (वय 34), दीपक शिवाजी वांडेकर (वय 28) आणि रोहित दत्तात्रय शेंडे (वय 32) आणि ॲड. घनशाम दराडे या चौघांना अटक केली आहे.

दराडे याने अपहरण होण्याआधी उमेश मोरे यांची माहिती आरोपींना दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

दराडे याने राजीनामा देताना आपल्याला पुणे बार असोसिएशनचे सचिव या पदावरून मुक्त करावे, असे नमूद केले आहे. हा राजीनामा पुणे बार असोसिएशनच्या कार्यकारिणी समोर सादर करण्यात आला होता. त्यानंतर सर्व सदस्यांच्या संमतीने राजीनामा मंजूर करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.