Pune crime News : पुण्यात माजी आमदाराच्या नातेवाईकाच्या घरात जबरी चोरी, 100 तोळे सोन्याचांदीच्या दागिन्यांसह 53 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – पुण्यात येरवडा परिसरात राहणाऱ्या माजी आमदाराच्या नातेवाईकाच्या घरात जबरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी या घरातून तब्बल 100 तोळे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 53 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी हरीश्चंद्र उर्फ राजु मनोहर मोझे (वय 42) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, येरवडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संगमवाडी परिसरात तक्रारदार भावासोबत राहतात. ते बांधकाम व्यावसायिक आहेत. हे दोघेही काही कामानिमित्त शुक्रवारी बाहेरगावी गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि जबरी चोरी केली. हरीश्चंद्र यांच्या घरातून 40 लाख 20 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळे तसेच भाऊ मोहन यांच्या घरातून 13 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

दरम्यान माझे कुटुंबीय परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी येरवडा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर येरवडा पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. बंगल्यात सीसीटीव्ही आहेत. त्यात चोरटे कैद झाले आहेत. प्रथमदर्शनी तीन चोरटे दिसत आहेत. सीसीटीव्ही व खबऱ्यांमार्फत या चोरट्यांचा माग काढला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक समीर करपे हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.