Pune Crime News : पुण्यात सैराटची पुनरावृत्ती, बहिणीच्या प्रियकरावर भाऊ आणि वडिलांचा प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज – पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात सैराटची पुनरावृत्ती घडल्याचा प्रकार उघडकीस आलाय. बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन भावांनी आणि वडिलांनी प्रियकरावर प्राणघातक हल्ला केला.

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास धानोरे येथे ही घटना घडली. यामध्ये राजू गौतम भिसे (वय 25) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

जखमी तरुणाची आई सुनीता भिसे यांनी विश्रांतवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष मोरे, जीवन परियार, प्रतीक ओव्हाळ आणि सुनील ओव्हाळ या चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, जखमी राजू याचे प्रतिकच्या बहिणी सोबत प्रेमसंबंध आहेत. याच कारणावरुन हा वाद झाला. माझ्या बहिणीचा नाद सोडून दे असे सांगत प्रतीक आणि त्याच्या वडिलांनी इतर दोन साथीदारांच्या मदतीने राजू भिसे याला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. राजुला वाचविण्यासाठी मध्ये गेलेल्या त्याच्या आईला ही आरोपींनी मारहाण केली. यामध्ये राजू भिसे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर विश्रांतवाडी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.