Pune Crime News : शितळादेवीच्या मंदिरातून चांदीचा मुकुट आणि दानपेटीतील पैसे चोरीला

एमपीसी न्यूज – पुणे शहरात मध्यवस्तीत असलेल्या शितळा देवीच्या मंदिरातून अज्ञात चोरट्याने चांदीचा मुकुट आणि दान पेटीतले पैसे चोरून नेल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला आहे.

याप्रकरणी भरत कोटा (वय 40) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शितळादेवीचे मंदिर आहे. कोरोनामुळे सध्या पुणे शहरात निर्बंध असल्यामुळे मंदिर बंद आहे. दरम्यान रविवारी रात्री मंदिर बंद असताना कुलूप तोडून एक अज्ञात चोरटा मंदिराच्या आत शिरला. त्याने देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करत देवीचा चांदीचा मुकुट आणि दानपेटीतील काही चिल्लर पैसे चोरून नेले.

या मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. परंतु या चोरट्याने जाताना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील सोबत नेला आहे. दरम्यान रविवारी सकाळी काही नागरिक मंदिरात गेले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. समर्थ पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.