Pune Crime News : सासऱ्याचा खून करून फरार झालेला जावई ‘एलसीबी’कडून जेरबंद

मिरवडी (ता. दौंड) येथे आज, सोमवारी ही कारवाई करण्यात आली. ; Son-in-law arrested for murdering father-in-law

एमपीसीन्यूज : पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात चिडून सासऱ्यावर चाकूने वार करुन त्यांचा खून करुन पसार झालेल्या जावयाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले.  मिरवडी (ता. दौंड) येथे आज, सोमवारी ही कारवाई करण्यात आली.

सुरेश सदाशिव भोसले (वय 40, रा. मिरवडी, ता. दौंड जि. पुणे) असे या आरोपी जावयाचे नाव आहे. तर किसन देशा काळे (वय 60, रा. नाझरे-सुपे, ता. पुरंदर ) असे खून झालेल्या सासऱ्याचे नाव आहे.

आरोपी भोसले याची पत्नी नांदत नव्हती. त्यामुळे तो पुरंदर तालुक्यातील नाझरे-सुपे या सासरवाडीत पत्नीला आणायला गेला होता. तिथे त्याचे पत्नी आणि सासऱ्यासोबत भांडण झाले.

त्यावेळी चिडून आरोपी भोसले याने सासरे किसन काळे यांच्यावर चाकूने वार करून त्यांचा खून केला.

त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला होता.

दरम्यान, पुणे- सोलापूर महामार्गावर गस्तीवर असलेल्या ‘एलसीबी’च्या पथकातील पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी भोसले याला दौंड तालुक्यातील मिरवडी येथे सापळा लावून ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अधिक तपाससाठी त्याला जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, सहायक फौजदार दत्तात्रय जगताप , श्रीकांत माळी, पोलीस हवालदार राजापूरे, पोलीस नाईक विजय कांचन, पोलीस शिपाई धिरज जाधव, अमोल शेडगे, मंगेश भगत , बाळासाहेब खडके यांनी केली आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.