Pune Crime News : अजित पवार यांच्या पुण्यातील बंगल्यासमोर आंदोलन करणाऱ्या दहा जणांना अटक

एमपीसी न्यूज – शासकीय नोकरीतील एससी, एसटीचे पदोन्नतीची आरक्षण महाराष्ट्र सरकारने रद्द केल्याचा गैरसमज करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील भोसले नगर येथील निवासस्थानासमोर आंदोलन करणाऱ्या आझाद समाज पार्टीच्या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. चतुःशृंगी पोलिसांनी ही कारवाई केली.

भीमराव दत्तू कांबळे (वय 31), अभिजीत मधुकर गायकवाड (वय 32), रफिक रुस्तुम शेख (वय 37), अंकित परशुराम गायकवाड (वय 21), दर्शन बाबुराव उबाळे (वय 25), दत्ता मोहन भालशंकर (वय 38), विनोद लक्ष्मण वाघमारे (वय 34), महेश वैजनाथ थोरात (वय 21), सागर विरभद्र जवई (वय 23) आणि शरद गौतम लोखंडे (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बसवराज महादेव माळी यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे आजाद समाज पार्टीचे सदस्य आहेत. राज्य सरकारने शासकीय नोकरीतील एससी एसटी समाजाचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याचा गैरसमज करून घेऊन त्यांनी कोणतीही परवानगी न घेता आणि गैर कायद्याची मंडळी जमा करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भोसले नगर येथील जिजाई बंगल्यासमोर सोमवारी दुपारच्या सुमारास आंदोलन होते.

यावेळी आंदोलकांनी मोठ्या आवाजात शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून दहशत निर्माण केली. यावेळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर फिर्यादी आरोपींना ताब्यात घेत असताना त्यांनी फिर्यादी अशी झटापट करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे. चतु:शृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.