Pune Crime News : विमाननगरमध्ये नंग्या तलवारी नाचवत दहशत; तरुणावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज – सराईत गुन्हेगारांनी हातात नंग्या तलवारी घेऊन दहशत माजवत एका तरुणावर सपासप वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हि घटना रविवारी (दि.25) मध्यरात्री विमाननगर येथे घडली.

याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तुषार बनसोडे, महेश बलभीम सरोदे, आकाश घोडेस्वार, करण भरत सोनवने यांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात विशाल कापसे (वय-21) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश, आकाश आणि करण हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दोन दिवसांपूर्वी फिर्यादी यांच्या मामाचा मुलगा करन तुजारे व आरोपीमध्ये वाद झाले होते. हे वाद फिर्यादी याने मिटवले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता.

रविवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास आरोपी विमाननगर परिसरात हातात नंग्या तलवारी घेऊन आले. त्यांनी फिर्यादीकडे पाहून ‘हा पण होता का रे’, असे म्हणत त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर आरोपींनी तलवारीने त्यांच्यावर वार करत परिसरात दहशत माजवली. ‘कोणी मध्ये आल्यास त्याला ठार करू’, असे म्हणत तुफान गोंधळ घातला. त्यानंतर आरोपी येथून पसार झाले.

विमानतळ पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III