Pune Crime News : सदाशिव पेठेत मृतावस्थेत सापडलेल्या ‘त्या’ महिलेची ओळख अद्याप पटलीच नाही

0

एमपीसी न्यूज – पुण्याच्या सदाशिव पेठेतील एका घरामध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह सापडला होता. काम सुरु असणाऱ्या एका घरात हा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली होती.

या महिलेचे वय अंदाजे 30 ते 35 दरम्यान आहे. दरम्यान तीन दिवस उलटून गेले तरी या महिलेची ओळख मात्र अजूनही पटलेली नाही. विश्रामबाग पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदाशिव पेठेत एका जुन्या घराच्या आतील काम सुरु आहे. त्यामुळे तेथे कोणी राहत नाही. सोमवारी सकाळच्या सुमारास या घरातून वास येत असल्यामुळे नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या महिलेच्या अंगावर गुलाबी रंगाचा गाऊन होता.

दरम्यान या प्रकरणातील शवविच्छेदनाचा अहवाल आला असून यामध्ये संशयास्पद काहीही आढळले नाही मात्र तरीही विसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तिची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तिकोळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.