Pune Crime News : न्यायालयात हजर करताना पोलिसांच्या ताब्यातून अल्पवयीन मुलगी पसार

एमपीसीन्यूज : वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या मुलींना न्यायालयात हजर करत असताना पोलिसांच्या ताब्यातून एक पीडित अल्पवयीन मुलगी पसार झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्याच गुन्ह्यातील पीडित मुलींना आज न्यायालयात हजर करताना हा प्रकार घडला. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलीस पसार झालेल्या मुलीचा शोध घेत आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, भारती विद्यापीठ पोलिसांनी तीन महिन्यांपूर्वी वेश्याव्यवसायावर छापा टाकत 4 मुलींची दलालांच्या तावडीतून सुटका केली होती. त्यानंतर या मुलींना रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आले होते.

याच गुन्ह्यात दोन दिवसांपूर्वी महिला पोलीस हवालदाराला 5 हजार रुपयांची लाच घेताना ‘एसीबी’च्या पथकाने अटक केली होती. हा गुन्हा तोच असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, लाच प्रकरण घडल्यानंतर यातील मुलींना घेऊन पोलीस न्यायालयात हजर करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक एक अल्पवयीन मुलगी न्यायालयातून पसार झाली. काही क्षणातच हे प्रकरण समोर आल्यानंतर मात्र पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

दरम्यान, पसार झालेल्या मुलीचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे. पण अद्याप तरी ती मुलगी सापडलेली नाही. ही मुलगी कोल्हापूर येथील असल्याचे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.