Pune Crime News : शतपावलीसाठी बाहेर पडले अन्‌ चोरट्याने लक्ष्मीपुजेसाठी ठेवलेले दीड लाखाचे दागिने पळविले

एमपीसीन्यूज : लक्ष्मीपुजनाच्या दिवशी ताम्हणाच्या पात्रात त्यांनी दागिने ठेवून त्याची पूजा केली. गोडधोड जेवणानंतर घराचा दरवाजा ओढून रात्री शतपावली करण्यासाठी घराच्या टेरेसवर गेले. नेमकी हीच संधी साधत चोरट्याने घरात शिरून ताम्हणाच्या पात्रात ठेवलेले दीड लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन पळ काढल्याचा प्रकार शनिवारी रात्री वारजे माळवाडी येथे घडला.

दिवाळीच्या लक्ष्मीपुजनाची शनिवारी सगळ्यांच्याच घरात जय्यत तयारी सुरू होती. वारजे माळवाडी येथे राहणाऱ्या 37 वर्षीय नागरिकाच्या घरीदेखील लक्ष्मीपुजेची तयारी झाली होती. देवपूजेसाठी मांडलेल्या ताम्हणाच्या पात्रामध्ये दागिने, पैसे व अन्य मौल्यवान वस्तू ठेवून नागरिकाच्या कुटुंबीयांनी त्यांची धार्मिक पद्धतीने पूजाअर्चा केली.

पूजा झाल्यानंतर कुटुंबीयांनी एकत्र जेवण घेतले. त्यानंतर रात्री साडे दहा वाजता शतपावली करण्यासाठी ते घराच्या टेरेसवर गेले. जाताना त्यांनी घराचा दरवाजाला कुलूप लावण्याऐवजी दरवाजा फक्त ओढून घेतला.

फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे व आतमध्ये कोणीही नसल्याचे पाहून चोरट्याने त्यांच्या घरात शिरून ताम्हणाच्या पात्रामध्ये ठेवलेले दीड लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.

फिर्यादी शतपावली करून परत आल्यानंतर त्यांना दागिने दिसले नाहीत. त्यांनी घरामध्ये शोध घेतला, मात्र दागिने सापडले नाहीत. त्यांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.