Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील वारजे, खडकी आणि लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. यातील दोघांचा मृत्यू हा रस्त्यावरून पायी जात असताना तर एका व्यक्तीचा मृत्यू दुचाकीचा अपघात झाला. संबंधित पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-बंगळूर महामार्गावर समोरील चारचाकी ने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणाऱ्या दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर दुचाकीवरील दोघेही खाली पडले. यामध्ये दुचाकी चालक महेश भिमराव शिंदे (वय 35) यांना जबर दुखापत झाली असून त्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. दुचाकीवरील अनिल लक्ष्मण सावंत हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुसरा अपघात खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किर्लोस्कर कंपनीच्या गेट जवळ झाला. यामध्ये भरधाव वेगातील डंपरचे चाक पोटावरून गेल्याने महादेव हंबीर कांबळे (वय 59) यांचा मृत्यू झाला. महादेव कांबळे पायी जात असताना भरधाव वेगातील डंपरने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये कांबळे हे खाली पडल्यानंतर डंपरचे चाक त्यांच्या पोटावरुन गेले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तिसरा अपघात लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघेली गाडेवस्ती या ठिकाणी झाला. या अपघातात उत्तम भोजाजी रणखांबे (वय 70, रा. कटकवाडी, वाघोली) यांचा मृत्यू झाला. उत्तम रणखांबे हे रस्ता क्रॉस करीत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झालाय. लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.