Pune Crime News : पोलिसांना मारहाण करणारे दोघे ताब्यात

एमपीसी न्यूज – नो पार्किंग मध्ये उभ्या केलेल्या वाहनावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला वाहतूक पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या मुलांना न्यायालयासमोर हजर केले असता दोघांचीही रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तर उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पुणे अहमदनगर रस्त्यावरील इनॉर्बिट मॉल समोर हा प्रकार घडला होता. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने महिला वाहतूक पोलिसांसह काही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली होती. यामध्ये पोलीस कर्मचारी संतोष रायकर आणि लखन शेंडगे जखमी झाले होते. पोलीस नाईक वंदना आल्हाट यांनी याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा अज्ञात तरुणांनी विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे आणि जमून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एका मॉल समोर नो पार्किंग मध्ये पार्क केलेल्या गाड्यांवर महिला पोलीस कर्मचारी कारवाई करीत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी महिला पोलिस आणि इतर कर्मचाऱ्यांशी वाद घातला आणि शिवीगाळ करून निघून गेले होते. काही वेळानंतर ते आणखी तीन तरुणांसह त्या ठिकाणी परत आले. यावेळी त्यांनी महिला पोलीस आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या इतर सहकाऱ्यांना मारहाण केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वजण पसार होते. यातील दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.