Pune Crime News : तहसीलदाराच्या नावाने लाच मागणारे दोघे जेरबंद

जमिनीवरील इनामी शेरा रद्द करण्यासाठी मागितली सहा लाखांची लाच, दोघांविरूद्ध गुन्हा

एमपीसी न्यूज – जमीनीवरील इनामी शेरा रद्द करण्यासाठी तहसीलदारांच्या नावाने दोन खासगी व्यक्तींनी 6 लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राजेंद्र मोरे (रा. फुरसुंगी) आणि गुंजाळ (पूर्ण नाव पत्ता नाही) अशी लाच मागणाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार यांची हडपसरनजीक फुरसंगी गावात जमीन आहे. जमिनीतील इनामी शेरा रद्द करण्याचे प्रकरण तहसील कार्यालय हवेलीत प्रलंबित आहे. त्यासंदर्भात तहसीलदार हवेली यांच्याकडून काम करून देतो, असे सांगत त्यांचा इनामी शेरा रद्द करण्यासाठीचे पत्र मिळवून देण्याची बतावणी करीत तक्रारदार यांच्याकडून सहा लाख रुपये लाचेची मागणी केली.

इनामी शेरा रद्द करण्यासाठी नोंद घेण्याबाबतचे पत्र मिळवून दिले. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली असता दोघांनी लोकसेवक यांच्या नावाने 6 लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.