Pune Crime News : कोरोना चाचणी किटचे कायदेशीर वितरक असल्याचा बनाव करून फसवणूक, गुजरातमधून दोघांना अटक
एमपीसी न्यूज – माय लॅब या कंपनीच्या नावाचे बनावट डोमेन तयार करून त्याद्वारे कोरोना चाचणी किटची ऑर्डर निर्माण करत लोकांची फसवणूक केल्या प्रकरणी दोन जणांना जामनगर, गुजरात येथून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने हा प्रकार उघडकीस आणला.
संस्कार संस्कृत उर्फ ऋषी (वय 19) आणि प्रशांत सिंग (दोघेही रा. जामनगर, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत चेतन सोनराज रावळ यांनी (रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माय लॅब या कंपनीकडून कोव्हीसेल्फ या कोरोना चाचणी करण्यासाठी वापरल्या जाणा-या किटची निर्मिती केली जाते. किटच्या निर्मिती आणि वितरणाचे अधिकार याच कंपनीकडे आहेत. आरोपींनी कंपनीच्या नावाचे साधर्म्याचा वापर करून नवीन डोमेन तयार केले. आरोपींनी फिर्यादी यांच्या नावाचा वापर करून एक ईमेल तयार केला तसेच त्यांच्या फर्मचा लोगोही वापरला. आरोपींनी बनावट फेसबुक पेज तयार करून कोरोना चाचणी किट विकणारी कंपनी असल्याचा बनाव केला व लोकांची फसवणूक केली.
आरोपींना जामनगर, गुजरात येथून अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 27 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सायबर विभाग अधिक तपास करीत आहे.