Pune Crime News : दरोड्याच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेले मारणे टोळीतील दोघे जेरबंद

गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

एमपीसीन्यूज : बोपदेव घाटात लघुशंकेला थांबलेल्या इसमाला मारहाण करून त्यांच्याकडील दोन सोन्याच्या आंगठ्या आणि सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेल्याप्रकणी दाखल गन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या मारणे टोळीतील दोन गुंडांना जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या  पथकाला यश आले.

अभिषेक ऊर्फ नन्या उदय मारणे (वय 21, रा. मंदीराजवळ मु. पो. माळेगाव, ता. मुळशी आणि अक्षय अशोक सावले (वय 23 , रा. गणेश मंदीराजवळ मु. पो. खामबोली, ता. मुळशी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी महंमद वसीम महंमद सलीम कुरेशी (रा. 399, कोळसा गल्ली, कॅम्प, पुणे ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

फिर्यादी कुरेशी दोनवर्षांपूर्वी मित्रांसमवेत बोपदेव घाटातून जात होते. लघुशंका आली म्हणून ते घाटात थांबले असता आरोपी संकेत मारणे, सुरज जाधव, राम गायकवाड, अभिषेक आणि अक्षयसह अन्य पाच ते सहा आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेल्या महिलेला दगडाचा धाक दाखवीत सोन्याच्या दोन अंगठ्या आणि आवेज खान यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेतली होती.

याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर संकेत मारणे व इतर 3 आरोपी अटक करण्यात आले होते. त्यांनतर अभिषेक मारणे, अजय जाधव, एक अनोळखी इसम सन 2019 पासून पोलीसांना गुगांरा देत होते.

युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार युनिट एकचे अधिकारी व अंमलदार कार्यक्षेत्रात पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार सचिन जाधव व दत्ता सोनावणे यांना फरार आरोपी अभिषेक ऊर्फ नन्या हा मित्रासह घोटावडे फाटा येथील मुळशी चायनिज सेंटरवर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार युनिट एकच्या पथकाने तिथे सापळा लावला. त्यावेळी चायनिज सेंटरमध्ये आलेल्या दोघांची नजर कावरी बावरी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांनी त्यास ‘काय अभिषेक’ असा आवाज दिला. त्यामुळे पोलीस आल्याचे लक्षात येताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या आवळल्या.

या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या आरोपींना कोंढवा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेले आहेत.

गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार सुशिल जाधव, दत्ता सोनावणे, विजयसिंह वसावे, अशोक माने, शशीकांत दरेकर, आय्याज दड्डीकर, महेश बामगुडे, मिना पिंजण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.