Pune Crime News : ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस लाच स्वीकारताना जाळ्यात

एमपीसीन्यूज : पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

दादासो शिवाजी दराडे (वय 26) आणि रमेश काळे अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे दोघेही यवत पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. यातील दादासो दराडे हे कॉन्स्टेबल, तर रमेश काळे पोलीस नाईक आहेत. यवत पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार व्यक्ती आणि त्याच्या नातेवाईकांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील तक्रारदार व्यक्तीचे नाव कमी करण्यासाठी अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदार व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या माहितीची खातरजमा केली असता आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांनी लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शुक्रवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या दोघांना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानंतर या दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.